खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, सोळाही आमदार पात्र घोषित

 खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, सोळाही आमदार पात्र घोषित

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षात 2022 साली उभी फूट पडल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे सोळाही. आमदार पात्र असून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र घोषित करण्याची केलेली याचिका अध्यक्ष नार्वेकरानी आज फेटाळून लावली. यामुळे जून 2022 मध्ये सुरु झालेल्या राज्यातील सत्ता संघर्षाचा शेवटचा अंक पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळेल.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी गेल्या महिन्यात पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक वर्ष आठ महिन्यांनी या प्रकरणाचा निकाल विधिमंडळ स्तरावर लागला आहे. सुरूवातीला अत्यंत संथ गतीने सुरू असलेली ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वेगाने सुरु झाली होती. आधी 31 डिसेंबर 2023 आणि त्यानंतर 10 जानेवारी 2024 अशी अंतिम मुदत सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकर यांना दिली होती त्यानुसार नार्वेकर यांनी आज हा निकाल दिला. तब्बल दीड तास नार्वेकर यांनी आपल्या या निकालाचे वाचन संपूर्णपणे इंग्रजीतून केले. उद्धव ठाकरे गटाला अपेक्षित असणारा हा निकाल नसल्याने साहजिकच पुन्हा एकदा ठाकरे गट या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल हे उघड आहे.

आजच्या आपल्या निकालात अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष नेमका कोणाचा?, त्याचा प्रमुख कोण ?, आणि विधिमंडळात कोणाचा पक्षादेश अर्थात व्हीप लागू होतो यावर प्रामुख्याने भाष्य केले. आपण पक्षाच्या दोन्ही गटाकडे पक्षाच्या घटनेची प्रत मागितली होती त्यावर ठाकरे गटाने 2018 साल ची प्रत उपलब्ध करुन दिली तर शिंदे गटाने प्रतच उपलब्ध करुन दिली नाहीं असे नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटले आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आपण ही प्रत उपलब्ध करुन घेतली असे या निकालात म्हटले आहे.

ठाकरे गटाने उपलब्ध केलेली घटनेची प्रत आणि पक्षाचे नेतृत्व म्हणजेच उद्धव ठाकरे हे 1999 सालच्या मूळ घटने नुसार निवडून आलेले नाहीत. तसेच 2013 आणि 2018 साली पक्षांतर्गत निवडणुका झाल्याच नव्हत्या त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद ग्राह्य धरले जाणार नाही असे राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नव्हता, त्याच प्रमाणे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून सुनील प्रभू यांचे प्रतोदपद जून 2021 मध्ये संपुष्टात येऊन भरत गोगावले यांना मुख्य प्रतोदपदी कायदेशीर रित्या नेमण्यात आले असे दिसून येते.

यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हाच खरा राजकिय पक्ष आहे त्यामूळे पक्षाची 22 जुन 2022 रोजी बोलावण्यात आलेल्या बैठकीला 16 आमदार उपस्थीत नव्हते हा ठाकरे गटाचा दावा मान्य करता येणार नाही त्यासोबतच ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही अपात्र ठरविण्यात येऊ शकत नाही असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटले आहे. अध्यक्षांच्या आजच्या या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निकालावर जोरदार टीका करत, हा एकतर्फी आणि संपूर्णपणे पक्षपातीपणाचा निर्णय असल्याचं म्हटले आहे. दरम्यान आजच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ठाकरे गटाच्या वकिलांची एक बैठक नवी दिल्ली येथे पार पडली, त्यात या निकालावर पुढील रणनीती ठरविण्यात आली. त्यानुसार आता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात या निकाला विरोधात दाद मागेल हे उघड आहे. घटनेच्या दहाव्या कलमाचे पालन अध्यक्ष नार्वेकर यांनी केले नाही असा दावा करून राज्यातील सत्ता संगर्षाचा शेवटचा अंक सर्वोच्च न्यायालयात रंगेल अशी स्पष्टं चिन्ह असून हा अंक आणखी किती काळ चालतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ML/KA/PGB 10 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *