दीड एकर परिसरात उभारलं जातय छत्रपती शिवरायांचं भव्य मंदीर
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवत आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जाहीर सभांमधून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपण शिवरायांचे मंदिर बांधणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली. याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून झाल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी आणि साईनाथ चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून, सुमारे दीड एकर परिसरात या मंदिराची निर्मिती होत आहे. मंदिराचे 80 ते 90 टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील वर्षी शिवजयंती किंवा शिवराज्याभिषेक दिनापर्यंत हे ऐतिहासिक कार्य पूर्ण होणार आहे.
भिवंडीतील हे शिवमंदिर विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे, कारण मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे शिल्पकार असलेल्या शिल्पकारानेच साकारली आहे. या मूर्तीचे असामान्य सौंदर्य आणि ताकद पाहून शिवभक्त भारावून जातात. राजूभाऊ चौधरी यांनी सांगितले की, राज्यभरात शिवरायांचे अनेक पुतळे उभारले गेले असले, तरी त्यांची योग्य निगा न राखल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे महाराजांचे मंदिर उभारून योग्य देखभाल होईल, तसेच शिवभक्तांना प्रेरणादायी वातावरण मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
मंदिराची रचना देखील अत्यंत भव्य असून संपूर्ण किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात आहे. सुमारे 60 ते 65 फूट उंच असलेले हे मंदिर भविष्यातील 300 ते 400 वर्षे टिकेल, यासाठी मजबुतीच्या दृष्टीने बांधले जात आहे. चारही बाजूला भक्कम तटबंध, भव्य महादरवाजा आणि सुंदर शिल्पकलेने सजलेले हे मंदिर शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा ठरले आहे. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित घटनांचे चित्रण साकारण्यात आले असून शिवचरित्र भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
SL/ML/SL
10 Nov. 2024