सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले

 सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करासार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले

मुंबई, दि २९
सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी संबंधित विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

या महामार्गावरील रस्त्यांची प्रगती, कराड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, तसेच साखर हंगामामुळे वाढलेली ऊस वाहतूक याबाबत आज सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत मंत्री भोंसले यांनी अधिकाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस व तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

सध्या सातारा–कोल्हापूर महामार्गालगत सुमारे आठ साखर कारखाने कार्यरत असून त्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे काही ठिकाणी वाहन पलटी होणे, अपघात होऊन तासनतास वाहतूक ठप्प होणे अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री भोंसले यांनी ठराविक अंतरावर क्रेन उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले, जेणेकरून अपघात झाल्यास त्वरित मदत मिळून वाहतूक सुरळीत होईल.

तसेच, महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, जेणेकरून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध राहील. ज्या ठिकाणी पुलांचे बांधकाम प्रलंबित आहे, त्या ठिकाणच्या ठेकेदारांना तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले की, महामार्गावर वाहतूक सुलभतेसाठी योग्य दिशादर्शक फलक लावणे, सर्व्हिस रोडची दुरुस्ती आणि प्रकाशयोजना सुधारणा या बाबींवरही विशेष लक्ष द्यावे.

या बैठकीस आमदार श्री. मनोज घोरपडे, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, उपसचिव सचिन चिवटे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसेच दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी सांगितले की, “जनतेला वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात. महामार्गावरील सर्व्हिस रोड, फलक आणि सुरक्षाव्यवस्था सुधारून नागरिकांची गैरसोय कमी करणे हे आपले प्राधान्य आहे.”KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *