बेलवंडी कोठार बारव संवर्धनासाठी शिवदुर्गवीर सरसावले ….

अहिल्यानगर दि. ४–
“महाराष्ट्र बारव मोहिम” अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन आणि शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील ९०० वर्षापूर्वीच्या पुरातन बारवची सलग दुसऱ्या आठवड्यात श्रमदान मोहीम राबविण्यात आली. ही ४७ वी स्वच्छता श्रमदान मोहीम होती.यामध्ये १३ शिवदुर्ग सदस्यांनी सहभाग नोंदवला.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर यांच्या नियोजनात ही मोहिम पार पडली. शिवदुर्ग सदस्यांनी ही बारव स्वच्छता मोहीम राबवतांना बारवेच्या आतील तळाशी गाळ काढायला सुरुवात केली आहे. अनेक तास श्रमदान करत बारवेच्या तळाशी थडी धरून गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे. गाळाने बुजलेल्या दोन दगडी पायऱ्या मोकळ्या करण्यात यश मिळाले. अंदाजे दोन ट्रॉली गाळमाती बाहेर काढण्यात यश मिळाले.
या मोहिमेत अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर, उपाध्यक्ष दिगंबर भुजबळ, अमोल बडे, प्रा. प्रणव गलांडे, ऍड.गोरख कडूस,मारूती वागसकर, तुषार चौधरी, रहिम हवालदार, ईश्वर कोठारे, आयुष बडे, शंभुराजे कडूस, कुणाल खोमणे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आपल्या पूर्वजांचा वैभवशाली ऐतिहासिक वारसा असणाऱ्या बारव जतन करण्यासाठी शिवदुर्ग परिवाराने पुढाकार घेतला आहे. तरुणाई सोबत श्रमदान करून मोठं समाधान मिळतेय. बारवेचा गुदमरलेला श्वास मोकळा करतांना आम्हाला आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी अंगात वेगळीच वीरश्री संचारली असल्याचा भास जाणवतो. असे समाधान,आनंद कुठंच मिळत नाही. आम्ही बारव श्रमदान करतो याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. अशी माहिती शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर यांनी दिली.