शिवभोजन थाळी अडचणीत, शासनाने थकवले ७ महिन्यांचे बिल

राज्यातील शिवभोजन थाळी योजनेवर आर्थिक संकटात सापडली आहे. केंद्र चालकांची तब्बल ७ महिन्यांची बिले सरकारकडे थकीत असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. फेब्रुवारी २०२५ नंतर केंद्र चालकांना एकाही महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. राज्यात सध्या १,८८४ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. पूर्वी ही संख्या सुमारे २,५०० होती. मात्र अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे अनेक केंद्र बंद पडली आहेत.
शिवभोजन थाळीची किंमत ५० रुपये आहे. त्यापैकी १० रुपये लाभार्थ्यांकडून घेतले जातात, तर उर्वरित ४० रुपये सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळतात . हेच अनुदान गेल्या सात महिन्यांपासून थकले आहे त्यामुळे केंद्रचालकांना भाडे, विजबिल, किराणा तसेच कर्मचाऱ्यांचा पगार देणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवभोजन केंद्र चालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, भेट मिळत नसल्यामुळे त्यांचा रोष अधिकच वाढला आहे. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास शिवभोजन केंद्र बंद ठेवण्याचा इशारा केंद्रचालकांनी दिला आहे.