शिवाजी महाराजांच्या वंशजांना सरंजाम जमिनीवरील सूट कायम…

 शिवाजी महाराजांच्या वंशजांना सरंजाम जमिनीवरील सूट कायम…

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजघराण्यातील वंशज असलेल्या कुटुंबीयांची उपजीविका त्यांच्या दर्जानुसार चालावी म्हणून भोसले घराण्याच्या मालकीच्या खाजगी जमिनी तसेच इतर मालमत्तांवरील सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात लिनियल ठेवण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

“द बॉम्बे सरंजाम जहांगीर आणि इतर इनाम जमिनी कायदा १९५२ च्या नियमानुसार भोसले राजघराण्याच्या मालकीच्या सर्व सरंजाम जमिनी तथा इनामी मालमत्तांना ही सूट वंशपरंपरेने सुरूच राहणार आहे. भोसले कुटुंबातील वारसांच्या जमिनी तथा मालमत्तांवरील सूट तहहयात सुरू ठेवावी,अशी विनंती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २५ ऑगस्ट २०१६ रोजी एका पत्राद्वारे केली होती.

राजघराण्यातील कॅप्टन श्रीमंत शाहू प्रतापसिंह भोसले यांच्या मालकीच्या सरंजाम जमिनी आणि इनामी मालमत्तांना राज्यसरकारने सर्वप्रथम २१ जुलै १९५३ रोजी कायद्यानुसार सूट प्रदान केली होती. त्यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्रीमंत प्रतापसिंह महाराज शाहूमहाराज भोसले यांना ५ फेब्रुवारी १९५७ रोजी सूट देण्यात आली होती. त्यानंतर वंश परंपरेने ही सूट २८ फेब्रुवारी १९८० रोजी सातारा येथील श्रीमंत उदयनमहाराज प्रतापसिंह भोसले म्हणजेच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना देण्यात आली होती.

आता हीच सूट वंशपरंपरेने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लीनियल वारसांना तहहयात कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून राज्यसरकार छत्रपती उदयनराजे भोसले यांना ही सूट प्रदान केली जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या २५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महसूल विभागाने ९ जानेवारी २०२५ हा निर्णय प्रसिद्ध केल्याची माहिती महसूल आणि वन विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी दिली.

ML/ML/PGB 23 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *