नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात नाराजी
नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना आज उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाचे लोकसभा प्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी उमेदवारी फिरवल्याने नाराज झालेल्या करंजकर समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.
कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची असा निर्धार त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यासंदर्भात दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन करंजकर यांनी आपली भूमिका मांडली, यावेळी त्यांनी सांगितले की, मी जुना शिवसैनिक असून मी एकनिष्ठेने पक्षासाठी काम करत आहे, गेल्या एक वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करून कामाला लागण्याचे सांगितले होते, परंतू आज सकाळी शिवसेनेच्या यादीत माझे नाव वगळण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज झाले असून मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे, मी निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार आहे, मला डावलल्यास मी इतरांना पाडणार आहे, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
ML/ML/SL
27 March 2024