शिंदेंनी दाखवला मनाचा मोठेपणा, विरोधकांची कोल्हेकुई थांबली
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांची महायुती टिकून राहावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत काल भूमिका स्पष्ट केली. यातून एक संवेदनशील, भावनाप्रधान लोकांमध्ये जाऊन काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला असे शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे यांच्या भूमिकेने राज्यात सुरु असलेली विरोधकांची कोल्हेकुई थांबली, अशी टीका सामंत यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आणि शिवसेनेची भूमिका काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. मुख्यमंत्रीपद आणि सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
पाच वर्षापूर्वी शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळालेले असताना सत्तेसाठी ३४ दिवस शिवसेना आमदारांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर खुर्चीसाठी शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांपासून सुरु असलेले नैसर्गिक युती तुटली आणि आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्यावर जाऊन बसला, अशी खरमरीत टीका सामंत यांनी उबाठावर केली. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन रडायचं नसते तर लढायचे असते, असा संदेश काल शिंदे यांनी दिला.
महाराष्ट्राच्या जनतेची शेवटपर्यंत सेवा करणार असेही शिंदे म्हणाले. भाजपाच्या वरिष्ठांनी अडीच वर्ष दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून ती कोट्यवधी जनतेसमोर मांडण्याचा राजकारणातील सुसंस्कृतपणा शिंदे यांनी काल दाखवला, असे सामंत म्हणाले.
विरोधकांनी किती टीका केली तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी पुरेसे संख्याबळ विरोधी पक्षांना मिळाले नाही त्यामुळे त्यांनी शिंदेवर टीका करण्या ऐवजी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला सामंत यांनी लगावला. ते म्हणाले की, २० आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झाली आहे.
उबाठाला काँग्रेसचे आदेश पाळावे लागतात. महाराष्ट्रात भारत जोडो दरम्यान काँग्रेस नेत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता. त्याबाबत निषेध न करता सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, अशी टीका सामंत यांनी केली. निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतील काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, लवकरच त्याचा उलगडा होईल, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार कोटींचे प्रकल्प आले. रिफायनरीबाबत सरकार स्थापन झाल्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. रिफायनरीबाबत राजकारण करणाऱ्यांना कोकणातील जनतेने घरी बसवले, असे ते म्हणाले.
ML/ML/SL
28 Nov. 2024