शिंदे अडले गृहमंत्री पदावर , सस्पेन्स कायम….
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर तेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असून आज राजभवनवर जाऊन महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी उद्या सायंकाळी शपथविधी घेण्याचं निश्चित केला आहे. मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील अथवा नाही, त्यांना गृहमंत्री पद मिळेल अथवा नाही याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे .
राजभवनवर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्या सरकारमध्ये सहभाग असेल असा विश्वास व्यक्त केला असला तरी शिंदे यांनी मात्र त्याबाबत संदिग्धता कायम ठेवली आहे . आज सायंकाळी फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यात शिवसेनेच्या मंत्री आणि खात्यासंदर्भातील बाबी या चर्चेत होत्या असे समजते, मात्र एकनाथ शिंदे हे अद्याप गृहमंत्री पदासाठी आग्रही असून ते पद मिळत असल्यास आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारू असे त्यांनी या बैठकीत सांगितल्याचेही समजते.
शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांचा आग्रह शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे असाच आहे. शिंदे देखील सत्तेबाहेर राहून फारसे काही साध्य होऊ शकणार नाही याबद्दल आश्वस्त आहेत. दुसरीकडे शिंदे यांच्या अनिश्चिततेबद्दल टोला हाणताना अजित पवार यांनी आपण मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे असे ठामपणे जाहीर केले. त्यावर शिंदे यांची भूमिका नेमकी काय असेल हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होईल.
भाजपा गृहखाते शिवसेनेला देण्यास फारशी उत्सुक नाही मात्र अधिक ताणून धरणे महायुतीतल्या कोणत्याही पक्षाला शक्य होईल असे वाटत नाही. एकनाथ शिंदे यांना देखील मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून फार काही साध्य होईल असे नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. याशिवाय राजकारणात कधीतरी एक पाऊल मागे यावेच लागते याची देखील त्यांना खात्री असावी . त्यामुळे एका मर्यादेच्या बाहेर ताणून न धरता रात्री उशिरापर्यंत मंत्रीपदे आणि खातेवाटप यासंदर्भातील चर्चा पूर्ण होऊन उद्या सायंकाळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी अपेक्षा आहे.
ML/ML/PGB 4 Dec 2024