महापालिका शिक्षण समिती अध्यक्षांसोबत मराठी शाळा व शिक्षक संघटनांचा विधायक संवाद
मुंबई, दि २३
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्या सोबत शिक्षण तज्ञ डॉ विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आयोजित संयुक्त बैठकीत मराठी शाळांचे संस्थाचालक व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या बैठकीत महामुंबई शिक्षण संस्था, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ तसेच विविध शैक्षणिक संघटनांनी शिक्षणाशी संबंधित गंभीर व प्रलंबित प्रश्नांवर निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली.
संघटनेच्या वतीने अध्यक्ष मा. श्री सदानंद रावराणे, उपाध्यक्ष श्री राजेंद्र प्रधान, कार्यवाह डॉ. विनय राऊत, शिक्षक नेते डॉ. विशाल कडणे तसेच फादर स्वामी यांनी नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचे अभिनंदन करून शाळांच्या हितासाठी विधायक संवाद साधला.
सादर केलेल्या निवेदनात शाळांवरील वीज, पाणी व इतर कर निवासी दराने आकारणी करण्याची मागणी, मालमत्ता करातून संपूर्ण सूट, आरटीई कायदा २००९ अंतर्गत अनावश्यक मुदतवाढ प्रक्रिया रद्द करणे, तसेच २५% आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची प्रलंबित रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, बीएमसी इमारतींमध्ये कार्यरत अनुदानित मराठी व प्रादेशिक माध्यमांच्या शाळांवरील वार्षिक १०% भाडेवाढ स्थगित करणे, भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्गखोल्यांची संख्या कायम ठेवणे, वेतनेतर अनुदानाचा प्रश्न सोडवणे, तसेच शिक्षक व लिपिकांच्या रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली.
प्राथमिक अनुदानित शाळांसाठी सरल (SARAL) पोर्टल लॉगिन उपलब्ध नसल्याने शिक्षक भरती व प्रशासकीय प्रक्रिया प्रलंबित राहात असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली.
शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी सर्व मुद्द्यांची सकारात्मक दखल घेतली असून, पुढील ८ ते १० दिवसांत पुन्हा बैठक आयोजित करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
ही बैठक शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर विधायक संवाद घडवून आणणारी ठरली असून, महानगरपालिका क्षेत्रातील शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि सर्व स्तरांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.KK/ML/MS