उपेक्षितांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटवणे हेच आपले जीवनध्येय

 उपेक्षितांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटवणे हेच आपले जीवनध्येय

मुंबई, दि. १४ : जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणांमुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, विद्यादान सहाय्यक मंडळाच्या अध्यक्षा गीता शहा यांनी केले.

उत्तन मधील केशवसृष्टीच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक योगदानाचा १६ वा पुरस्कार विद्यादान सहाय्यक मंडळाच्या गीता शहा यांना देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यादान सहाय्यक संस्थेच्या वतीने आतापर्यंत ११०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविला आहे. यामध्ये डॉक्टर, अभियंते, परिचारक, तंत्रज्ञ, वकील, सनदी लेखापाल, कला दिग्दर्शक, वास्तु विशारद यांचा समावेश आहे.

आज ही संस्था ६ शाखा, ८ वसतिगृहे, १७ मार्गदर्शक समित्या, २० शिक्षण क्षेत्र, ११०० कार्यरत माजी विद्यार्थी या माध्यमातून ३५ जिल्ह्यातील ८५० विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यादृष्टीने प्रयत्न करीत आहे, याचाही गौरवपूर्ण उल्लेख गीता शहा यांनी केला. गीता शहा यांचा सन्मान मुंबई महानगर पालिकेच्या उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यादान सहाय्यक मंडळ आणि गीता शहा यांच्या गेल्या १७ वर्षांच्या अथक परिश्रमाचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.

शिक्षणाच्या माध्यमातून माणूस आणि पर्यायाने समाज घडविण्याचे काम विद्यादान सहाय्यक मंडळ करीत असल्याचे यावेळी बोलतांना डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले. हुशार असलेल्या पण गरीबीमुळे शिक्षणात अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांना इंग्रजी संभाषण, स्वावलंबन, व्यक्तिमत्व विकास, वाचन-लेखन कला अशा विविध विषयांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांचे नोकरी मिळविण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांच्या घरात असल्याचे गीता शहा यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले. तर डॉ. जांभेकर यांनी समाजात एक दिवा लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

गीता शहा यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याने ते पायावर उभे राहिल्यावर एका विद्यार्थ्याला उभे करावे आणि ज्योतीने ज्योत पेटवावी असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला ठाणे शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. केशवसृष्टी संस्थेच्या वतीने उत्तन भागात अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतात याची माहितीही यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून भरभरून दाद दिली.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *