अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सनी घेतली जोरदार उसळी
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे शेअर्सनी आज सहा महिन्यांची मगगळ दूर सारून जोरदार उसळी घेतली आहे. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर ८ टक्क्यांहून अधिक वाढून १२४८.९० रुपयांवर पोहोचला. दिवसअखेर हा शेअर ६.३८ टक्के वाढीसह १२२१.२५ रुपयांवर स्थिरावला. कंपनीनं केलेली एक मोठी घोषणा या अकस्मात तेजीला कारणीभूत ठरली आहे.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडनं (AGEL) राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील बडी सिड इथं २५० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा गुरुवारी केली. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीची एकूण कार्यक्षम अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता ११,४३४ मेगावॅटपर्यंत वाढली आहे, असं कंपनीनं बीएसईला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी ट्वेन्टी फाइव्ह लिमिटेडनं राजस्थानमधील जोधपूरमधील बडी सिड इथं २५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. ही बातमी कळताच शेअरच्या बाबतीत गुंतवणूकदारांचा मूड बदलला.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत २१७३.६५ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ८७०.९० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,९३,०५३.९६ कोटी रुपये आहे.