EC कडून शरद पवार गटाला मिळाले हे तात्पुरते नाव
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला. त्यानंतर आता होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव किंवा चिन्ह मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील एका नावावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र हे नाम तात्पुरते असून येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत, अर्थात राज्यसभा निवडणुका पार पडेपर्यंत हे नाव वैध असेल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार‘, असं आता शरद पवार गटाचे नाव असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून पक्षाच्या नवीन नावासाठी तीन पर्याय सांगण्यात आले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदराव पवार आणि एनसीपी – शरद पवार, या तीन नावांचा समावेश आहे
यात निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’, हे नाव स्वीकारले आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आगामी 6 जागांच्या निवडणुकीच्या उद्देशाने आणि निवडणूक आचार नियम, 1961 चा नियम 39AA नुसार एक वेळचा पर्याय म्हणून या गटाचे नाव म्हणून ही प्रक्रिया करण्यात आली आहे.
दरम्यान, शरद पवार गटाने त्यांच्या पक्षाची तीन नावे आणि चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. यातच कपबशी, चष्मा, सूर्यफूल आणि उगवता सूर्य यापैकी एक निवडणूक चिन्ह शरद पवार गटाकडून निवडला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
SL/KA/SL
7 Feb. 2024