शापूरजी ग्रुप टाटा सन्समधून घेणार एक्झिट

मुंबई: शापूरजी पालोनजी ग्रुप टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड (Tata Sons Pvt.) मधील आपली 18.4% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. या संभाव्य विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचा वापर ग्रुप आपले मोठे कर्ज फेडण्यासाठी करू शकतो. ब्लूमबर्गच्या एका अहवालात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आपली पायाभूत सुविधा युनिट गोस्वामी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड (Goswami Infratech Pvt.) द्वारे जारी केलेले 8,810 कोटी रुपयांचे बाँड्स फेडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जे एप्रिल 2026 मध्ये मॅच्युर होणार आहेत.
हे कर्ज पूर्ण किंवा अंशतः फेडल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि ग्रुपच्या इतर भांडवली प्रकल्पांनाही गती मिळेल. मात्र ही चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि त्यात पुढे बदल होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शापूरजी ग्रुप आणि टाटा सन्स यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
टाटा सन्सने शापूरजी पालोनजी ग्रुपशी त्याच्या हिस्सेदारीतून बाहेर पडण्याच्या पर्यायांवर चर्चा सुरू केली आहे. शापूरजी ग्रुपने तीन महिन्यांपूर्वीच भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्रेडिट डील अंतर्गत 3.4 अब्ज डॉलरची फंडिंग मिळवली होती. त्यानंतर ही बातमी समोर आली आहे. तसेच ग्रुप आपली बांधकाम आणि अभियांत्रिकी कंपनी एफकॉन्स (Afcons) चा 8,500 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणण्याचीही तयारी करत आहे.