शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद ‘मातोश्री’ वर
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनंत अंबानीच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झालेले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज शिवसेना प्रमुखांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला भेट दिली. यावेळी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि ठाकरे कुटुंबीयांनी त्यांच्या पादुका पूजन केले. या भेटीनंतर शंकराचार्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा आशीर्वाद दिला आहे. ते म्हणाले की, आपण सर्व सनातन धर्माचे अनुयायी आहोत. पुण्य आणि पापाची व्याख्या येथे स्पष्ट केली आहे. गोहत्या हे मोठे पाप आहे आणि त्याहूनही मोठा घात म्हणजे विश्वासघात आहे असे म्हटले जाते, असं ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं.
ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. ही वेदना अनेकांच्या मनात आहे. त्यांच्या विनंतीवरून आज आम्ही इथे आलो आणि त्यांनी आमचे स्वागत केले. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत आमचे दुःख कमी होणार नाही, असे आम्ही सर्वांनी त्यांना सांगितले. जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही, परंतु जो सहन करेल तो हिंदू असेल. विश्वासघात करणारा हिंदू कसा असू शकतो? याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होत आहे आणि हे निवडणुकीतून सिद्धही झाले आहे. उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे, असा जनतेचा विश्वास आहे.
ML/ML/SL
15 July 2024