शंकराचार्यांनी केली ‘धार्मिक सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करण्याची घोषणा
नवी दिल्ली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी धर्म शोधन सेवालय अर्थात ‘धार्मिक सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करण्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली असून 15 जानेवारी 2023 रोजी दिल्ली NCR मध्ये केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक वितरीत केले आहे.
चित्रपट, मालिका, वेबसिरिजच्या माध्यमातून धर्माचे पावित्र्य धोक्यात येईल अशाप्रकारची दृष्ये, संवाद, कथानक प्रसिद्ध करण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी या ‘धार्मिक सेन्सॉर बोर्ड’ ची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या बोर्डद्वारे चित्रपट, मालिका आणि OTT वरील कंटेटचे पुनरावलोकन केले जाईल. यामध्ये चुकीचे मंत्रोच्चारण केलेले आढळल्यास कारवाई केली जाईल. याबरोबरच शालेय अभ्यासक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे नाटक व स्टेज शो यांमधील कंटेटचे देखील पुनरावलोकन करण्यात येणार आहे.
शंकराचार्यांनी काढलेल्या पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, फक्त कारवाई करणे एवढेच काम हा धार्मिक सेन्सॉर बोर्ड करणार नसुन धार्मिक दृश्ये, कथानक, संवाद योग्य प्रकारे दाखवण्यासाठी निर्माते- दिग्दर्शकांनी बोर्डाकडे मागणी केल्यास त्याबाबत योग्य ते मार्गदर्शनही केले जाणार आहे.
ML/KA/SL
5 Jan. 2023