शक्तीपीठ महामार्ग स्थानिकांना विश्वासात घेऊनच

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
शेतकऱ्यांशी आणि संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गा संदर्भात पुढील कार्यवाही होणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. हा महामार्ग झालाच पाहिजे अशी देखील शेतकऱ्यांची निवेदनं आहेत, तसंच या महामार्गाच्या आखणीमध्ये काहींनी बदल सुचवलेले आहेत, या सगळ्याचा विचार करण्यात येईल, कोणताही प्रकल्प जनतेवर थोपवणार नाही, असं भुसे यांनी सभागृहाला आश्वस्त केलं.हे अधिवेशन संपल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी आणि त्या भागातील शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
सिंधुदुर्गातील पत्रादेवी ते वर्धा जिल्ह्यातील दिग्रस पर्यंत हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग असून १७ तीर्थस्थळं यामुळे जोडली जाणार आहेत. १२ जिल्ह्यातील ३९तालुक्यातून ३७२ गावांमधून हा मार्ग जाणार आहे, यासाठी ९ हजार ३८५ हेक्टर जमीन संपादनाची गरज आहे मात्र भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिली.
कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा महामार्ग केला जात आहे, असा आरोप करत हा विरोधकांनी हा महामार्ग रद्द करण्याची मागणी करत विरिधकांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाती तहकूब करण्यात आलं.
ML/ML/SL
29 June 2024