न्यूमोनिया बाधा होवून श्वसनप्रणाली बंद झाल्याने ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू
मुंबई, दि २६
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील शक्ती वाघाचा (वय ९ वर्षे सहा महिने) दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.१५ मिनिटांनी मृत्यू झाला. ‘शक्ती’चा मृत्यू श्वसननलिकेत हाड अडकल्याने झाला नसून, न्यूमोनिया बाधा झाल्यानंतर श्वसन प्रणाली बंद झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला आहे, असे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातून दिनांक १२ फेब्रुवारी २०२० रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात शक्ती (नर) करिश्मा (मादी) ही रॉयल बंगाल वाघाची जोडी देवाण-घेवाण तत्त्वावर आणली होती. तेव्हापासून ही जोडी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण ठरली होती. उद्यानात येणारे पर्यटक शक्ती व करिश्माला पाहण्यासाठी गर्दी करीत असत.
शक्ती वाघाने दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी अन्न ग्रहण केले नव्हते. त्यामुळे त्याला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. तसेच पाण्यातून औषधही देण्यात आले. दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी शक्तीने कोंबडीचे थोडे मांस खाल्ले व पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उलटीचा उमाळा (Retching) आला. दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोग्य तपासणी करण्यासाठी पिंजऱ्यात घेत असताना त्याला अचानक अपस्माराचे झटके (Convulsion) आले आणि दुपारी सव्वा बारा वाजता त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी शक्तीला कुठल्याही प्रकारच्या आजारपणाचे लक्षण नव्हते.
शक्तीच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपासून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ) येथील पशुवैद्यकीय पॅथेलॉजी विभागातील प्रोफेसर आणि त्यांच्या चमूने त्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार शक्तीचा मृत्यू हा न्यूमोनिया बाधा होवून श्वसन प्रणाली बंद झाल्याने (Payogranulomatous Pneumonia Resulting in Respiratory Failure) (ग्रॅन्युलोमॅटस न्यूमोनिया ज्यामुळे श्वसनक्रिया बंद पडते) ओढवला. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणाचा अहवाल सादर केला जाईल, असे प्राणिसंग्रहालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच शक्ती वाघाच्या अवयवांचे नमुने नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (गोरेवाडा) येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. शक्ती वाघाच्या मृत्यूची सविस्तर माहिती नियमानुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (Central Zoo Authority) व महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (Maharashtra Zoo Authority) यांना दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी इ-मेलद्वारे कळविण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयातील शिष्टाचारानुसार शक्ती वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
काही वृत्तपत्रांनी व प्रसारमाध्यमांनी शक्ती वाघाचा मृत्यू श्वसननलिकेत हाड अडकल्याने झाला, असे वृत्त प्रकाशित केले आहे. हे वृत्त खरे नाही. तसेच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाकडे कोणतीही चौकशी/विचारणा न करता परस्पर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून कळविण्यात आले आहे. सद्यस्थितीत, प्राणिसंग्रहालयात ‘जय’ हा वाघ (वय ३ वर्षे) तसेच ‘करिश्मा’ ही वाघिण (वय साडेअकरा वर्षे) प्रदर्शनीसाठी उपलब्ध आहेत, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.KK/ML/MS