शाहरुखचा ‘पठाण’ भगव्या बिकीनीमुळे वादग्रस्त
मुंबई, दि. 15(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडच्या खानावळीचे सर्वच चित्रपट हल्ली प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाट्यात सापडलेले दिसून येत आहेत. याला प्रसिद्धीसाठी जाणूनबुजून केलेला स्टंट म्हणावा की आणखी काही असा प्रश्न वाचकांना सतावू शकतो. शाहरुख खान आणि दिपिका पदूकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पठाण‘ हा आगामी चित्रपट असाच प्रदर्शनपूर्व वादात अडकला आहे.
पठाण या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यातील एका दृष्यामध्ये दिपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. यामुळे वादंग निर्माण झाला असून हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भगवा रंग हा हिंदु धर्माचा पवित्र रंग आहे. अश्लिल गाण्यामध्ये भगव्या रंगाची बिकीनी घालणे हा हिंदु धर्माचा अपमान आहे. असे म्हणत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी हिंदूंनी या चित्रपटावर बहिष्कार घालावा असे आवाहन केले आहे.
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटातील भगव्या बिकीनीचा सीन काढून टाकण्यात यावा अन्यथा राज्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही असा इशारा दिला आहे. 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
SL/KA/SL
15 Dec. 2022