दिव्यांग मतदारांची प्रत्येक मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था
मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): विधानसभा निवडणूकीत मुंबई कार्यक्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आणि प्रत्येक केंद्रावर ‘व्हीलचेअर’ तसेच मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण १७ हजार ५४० आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ६ हजार ३८७ असे मिळून एकूण २३ हजार ९२७ दिव्यांग मतदार आहेत. या सर्व दिव्यांग मतदारांना अत्यंत सुलभरित्या आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. या अंतर्गत दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरुन संबंधित मतदान केंद्रावर सहज व सुलभतेने येऊन मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघांमध्ये स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी ६१३ वाहतूक व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणांवर एकूण ९२७ वाहने नेमण्यात आली आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यात दिव्यांग मतदारांसाठी ६७१ वाहतूक व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणांवर एकूण ७० वाहने नेमण्यात आली आहेत. ही वाहने ३५ ‘रिंग रुट’ आणि ‘शटल रुट’वर सेवा देतील. यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी सुलभ असलेल्या बसेस, रिक्षा आणि इकोव्हॅनचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवार २० नोव्हेंबर रोजी ही वाहने या मार्गांवरून धावतील.
मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान करताना दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी २ हजार ८५ मतदान केंद्रांच्या ठिकाणी आणि एकूण २ हजार ५४९ ‘व्हीलचेअर’ उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या ‘व्हीलचेअर’वरुन दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या आत ने-आण करण्यासाठी तसेच अन्य मदतीसाठी २ हजार ८५ दिव्यांग मित्र तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच उपनगर आणि शहरातील एकूण ७ मतदानाच्या ठिकाणी जिन्यावर सरकत्या ‘व्हीलचेअर’ची देखील (स्टेअर क्लायबिंग व्हीलचेअर) व्यवस्था करण्यात आली आहे.
या सुविधांचा लाभ प्रत्येक दिव्यांग मतदारांना घेता येईल. तसेच या सुविधा सुनिश्चित करण्यासाठी आणि दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ स्तरावर समन्वयक अधिकारी (दिव्यांग मतदार) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, अधिक मदतीसाठी संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी किंवा १०९५ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क करुनही माहिती घेता येईल.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संनियंत्रण समितीची (सुगम्य निवडणुका) महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.