ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे निधन

 ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे निधन

पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रंजक आणि उद्बोधक प्रवासवर्णनांमधुन मराठी वाचकांना जगाची सफर घडवून आणणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे आज निधन झाले. ‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. दृष्टिहीन बांधवांसाठी हे पुस्तक ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित करण्यात आले. डॉ. मीना प्रभू या या मूळच्या पुण्याच्या होत्या, पण विवाहानंतर लंडनमध्ये स्थायिक झाल्या होत्या. पेशाने भुलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी ओघवत्या शैलीत प्रवासवर्णने लिहिली. त्यांनी 12 पेक्षा अधिक प्रवासवर्णने लिहिली होती. ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’, ‘गाथा इराणी’, ‘न्यूयॉर्क-न्यूयॉर्क’, ‘उत्तरोत्तर’, ‘अपूर्वरंग’, ‘रोमराज्य’ यांचा समावेश होता. बारीकसारीक तपशील हे त्यांच्या प्रवासवर्णाचे वैशिष्ट्य होते. गेल्याच वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेने मसाप जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.

डॉ. मीना प्रभू यांचा जन्म २७ ऑगस्ट १९३९ रोजी पुण्यात झाला. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन केल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. विवाहानंतर त्या इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांनी अनेक वर्षे भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून रुग्णसेवा केली. वैद्यकीय क्षेत्रातील काम सुरू असताना त्यांनी मराठीत प्रवासवर्णनपर लेखनास सुरुवात केली. पुढे त्यांनी कादंबरी लेखन केले. त्यांचे कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत.

मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुूषविले होती. प्रदीर्घ साहित्यसेवेची दखल घेऊन प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

SL/ML/SL

1 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *