सकाळच्या विशेष सत्रात विधानसभेत झाले वरिष्ठ अधिकारी निलंबित

 सकाळच्या विशेष सत्रात विधानसभेत झाले वरिष्ठ अधिकारी निलंबित

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक आणि भंडाऱ्यात भ्रष्टाचाराचे थैमान घालणाऱ्या तहसीदाराना निलंबित करण्याची घोषणा आज विधानसभेत सकाळी झालेल्या सभागृहाच्या विशेष बैठकीत करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांना तातडीने निलंबित करून त्यांची तीन महिन्यात चौकशी केली जाईल, यात आणखी दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. याबाबतची लक्षवेधी सूचना नमिता मुंदडा यांनी उपस्थित केली होती, त्यावर प्रशांत बंब यांनी उपप्रश्न विचारला.

चंद्रपूर बँक घोटाळा

चंद्रपूर जिल्हा बँकेची यंत्रणा हॅक करून तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम लुटणाऱ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. बँकेतील नोकरभरती सह अन्य गैरप्रकारांची देखील चौकशी यात करण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती.

मुंबईत सिआरझेड घोटाळा

मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच ना विकास विभागात बेकायदा रित्या केलेली बांधकामांपैकी २६७ प्रकरणात तातडीने कारवाई करून महानगरपालिके मार्फत ती तोडली जातील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. याबाबतची लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती. त्यावर पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी देखील विषयाचे गांभीर्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं.

याठिकाणी १६५ नकाशांमध्ये बेकायदा फेरफार करण्यात आले आहेत, तीनशे वीस अनधिकृत बांधकामे झाली आहेत, त्यातील एकवीस ठिकाणी महापालिकेनं चुकीची परवानगी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.

भंडाऱ्यात तहसीलदार निलंबित

भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्याच्या तहसीलदार विनिता लांजेवार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आजच विभागीय चौकशी सुरू करण्यात येईल त्यांना पदावरून तातडीने इतरत्र हलविण्यात येईल, त्यांनी बदलीसाठी मॅट कडून स्थगिती घेतली आहे ती रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली, याबाबतची लक्षवेधी सूचना नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित केली होती.

नद्यांच्या पूररेषा नव्याने

राज्यातील ज्या ज्या शहरात नद्यांच्या पूरपातळी साठी निळी आणि लाल रेषा आखण्यात आल्या आहेत, त्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यामुळे यासाठी तातडीने एक समिती स्थापन करून जलसंपदा विभागाच्या मार्फत त्याचं पुन्हा सर्वेक्षण करून याचा अभ्यास करण्याची कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना शंकर जगताप यांनी उपस्थित केली होती त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न विचारला. या रेषेत येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या विकास परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.

ML/ML/SL

25 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *