पोस्टाच्या माध्यमातून विदेशातही पाठवा फराळ

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी हा भारतीयांचा महत्त्वाचा सण आहे. फराळ आणि गोडधोडाविना दिवाळी या सणाची कल्पनाही करता येत नाही. दिवाळी निमित्त घराघरांत फराळ आणि गोडधोड करण्याची जुनी परंपरा आहे. आप्तांना हा फराळ मिळावा यासाठी घरातील गृहिणी प्रयत्न करीत असते. जवळपास असणार्या नातेवाईकांना दिवाळीचा फराळ मिळतो मात्र नोकरी आणि शिक्षणासाठी विदेशात असणार्याना दिवाळीच्या फराळा पासून वंचित रहावे लागते.
दिवाळीचा फराळ हा जवळपास असणार्या नातेवाईकांसह विदेशात राहणार्या नातेवाईक आणि आप्तांना मिळावा या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांची ही समस्या दूर केली आहे. भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून आता विदेशातही घरगुती फराळ आणि गोडधोड पाठविता येणार आहे. अतिशय कमी शुल्कात भारतीय डाक विभागाने विदेशात फराळ पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यात ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, जपान, मलेशिया, युएई, आदी देशांमधे राहणार्या आपल्या नातेवाईकांना आपल्या हातानी तयार केलेला घराचा आणि बाहेरचा फराळ पाठविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
2 किलो पासून ते 20 किलो पर्यंत फराळ पाठविण्याची व्यवस्था यात करण्यात आलेली आहे. नागपूर शहरातील जीपीओ, नागपूर शहर मुख्य डाक घरांमध्ये स्पेशल पॅकिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना घरून पॅकिंग करून आणण्याची गरज नाही. पॅकिंग डाक विभागातच करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन डाक विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
ML/KA/SL
11 Nov. 2023