विद्यार्थीनीने केले १००० वृक्षांच्या बीजांचे संकलन.
वाशिम, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खेळण्या-बागडण्याचे वय असलेल्या वाशिम येथील एस.एम.सी अर्थात श्रीमती मुलीबाई चरखा या इंग्रजी शाळेत वर्ग ७ मध्ये शिकणाऱ्या अक्षरा विजयसिंह देशमुख या विद्यार्थीनींने निसर्ग व्यासंगाचा आगळा-वेगळा छंद जोपासत वृक्ष लागवड आणि संवर्धनाकरिता तब्बल १००० विविध वृक्षांच्या प्रजातींच्या बिया गोळा करून वृक्षांची बेसुमार कत्तल करणाऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. आगामी पावसाळयात वृक्ष लागवडीसाठी अक्षरा या बियांचा वापर करणार असून तिच्या या आगळया वेगळया निसर्ग व्यासंगी छंदाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अक्षराने सभोवतालच्या निसर्गात सहज आढळणाऱ्या बेहडा, बाभूळ, वनबाभुळ, आपटा, अर्जुन, साग, पळस, काटेश्वर, गुलमोहर, चारोळी, मोह, आंजन, बेल, पनिर फुल, चिंच, काराटी , बोराटी, करवंद, रामफळ, टेंभुर्णी, पारिजात, हादगा, गुलमोहर, कवठ, घेवडा, एरंडा अशा ५० हुन अधिक वृक्षाच्या हजारो बियांचे संकलन शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे आणि राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वय अभिजीत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. जागतिक उष्मांकामुळे पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत असून बदललेले ऋतुचक्र, तापमानात झालेला बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, अस्मानी, सुलतानीचे संकट जगावर घोंगावत आहे. हे सर्व नैसर्गिक संकट म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले भविष्यातील विध्वंसाचे संकेत आहेत. हे विनाशकारी संकट टाळण्यासाठी मानवाने निसर्गाकडून सर्व काही घेण्याऐवजी वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या माध्यमातून निसर्गाला परत काही देण्याची वेळ आहे. तरच आपण कोपलेल्या निसर्गाला शांत करू शकतो. त्यामुळे अक्षराने जोपासलेला छंद प्रत्येक विद्यार्थ्यांने आणि नागरीकांने जोपासणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत जोशी यांनी केले आहे.
ML/KA/PGB 9 May 2023