पुण्याजवळील या किल्ल्यावर कलम १४४ लागू
पुणे,दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कबरींच्या ठिकाणी उरुसांचे आयोजन केले जाते. या आयोजनावर अनेक संघटनांकडून आक्षेप घेण्यात येतो. पुणे नजिकच्या लोहगड किल्ल्यावर उरुस भरवण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. किल्ल्यावर तीन दिवस 144 कलम लागू करण्यात आले आहे.
उद्या (दि. 6) लोहगडावर हाजी हजरत उमरशावली वली बाबाचा उरुस भरणार होता. या उरुसासाठी आयोजकांनी पुरातत्तव विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र उरुस भरवण्यास पुरातत्त्व खात्याकडून मान्यता देण्यात आलेली नाही. बजरंग दल आदी संघटनांनी या उरुसाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून गडावर कलम 144 लागू करण्यात आले आहे.
कलम 144 अंतर्गत लागू करण्यात आलेल्या तरतूदी
- व्हॉट्सअप आणि अन्य समाज माध्यमांद्वारे विद्वेषक संदेश, जातीय तेढ पसरवणारे संदेश. खोटी माहीती पाठवू नये. असे झाल्यास संबंधित ग्रुपच्या एडमिनला जबाबदार धरण्यात येईल.
- लोहगड- घेरेवाडी परिसरात स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या लेखी परवानगी शिवाय बॅनर्स /फ्लेक्स/होर्डींग्स लावण्यास प्रतिबंध
- लोहगड व परिसरात 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी जमा होऊ नये.
- संबंधित परिसरात मोर्चा, आंदोलने करू नयेत.
- समाजभावना भडकतील/दुखावतील अशा घोषणा/भाषणे करू नयेत.
- प्रतिबंधात्मक कालावधीत धार्मिक विधींसाठी पशुपक्ष्यांचे बळी देऊ नयेत.
- संबंधित परिसरातील ऐतिहासिक इमारती व सार्वजनीक वास्तूंचे नुकसान करू नये.
वरील बाबींचे उल्लंघन झाल्याचे आढळुन आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
SL/KA/SL
5 Jan. 2023