नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज

 नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज

मुंबई, दि. २७ : मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन शरण मांझी, केंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि केंद्रीय सचिव विजय कुमार, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ च्या निमित्ताने आज जगभरातील सागरी तज्ज्ञ, उद्योगपती आणि प्रतिनिधी भारतात एकत्र आले असल्याचे सांगून, केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, ‘गेटवे ऑफ इंडिया’ आता ‘गेटवे ऑफ द वर्ल्ड’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताचा ११ हजार किलोमीटरचा किनारा आता जागतिक विकास केंद्र होत आहे. सागरी क्षेत्र देशाच्या ‘जीडीपी’त ६० टक्क्यांहून अधिक योगदान देते. पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारत सागरी व्यापारात अग्रस्थानी होता. आज इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत पुन्हा आपली सागरी ताकद सिद्ध करत आहे. सागर, सागरमाला, गतिशक्ती आणि समुद्रयान यासारख्या प्रकल्पांमुळे सागरी पायाभूत सुविधांना नवे बळ मिळाले आहे. भारत जहाजबांधणीत जगात पाचव्या क्रमांकावर असून नवीन बंदरांचीही उभारणी वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, देशातील ९० टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. २०४७ पर्यंत भारत जागतिक सागरी नेतृत्व प्राप्त करण्याचे ध्येय आहे. वाढवण बंदर लवकरच जगातील टॉप १० बंदरांमध्ये गणले जाणार आहे. ग्रेट निकोबार व कोचिन बंदरात नव्या गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेसाठीही सरकारने ठोस उपाययोजना केल्या आहेत. जागतिक गुंतवणूकदारांनी भारताच्या सागरी क्षेत्रात सहभागी होऊन आपल्या आणि भारताच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू

भारत आणि महाराष्ट्राकडे विविध क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत नव्या ‘मेरीटाईम पॉवर’च्या रूपात उभा राहत आहे. महाराष्ट्र देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू आहे असे सांगून या प्रवासात गुंतवणूकदारांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सागरी ताकदीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. मुंबई पोर्ट आणि जेएनपीए देशाच्या कंटेनर वाहतुकीत मोठी भूमिका बजावत आहेत.
यात मुंबईसह, महाराष्ट्रातील बंदरांची भूमिकाही सदैव महत्वाची राहिली आहे. यातूनच मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वाढवण पोर्टचे बांधकाम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर हे बंदर जगातील महत्वाच्या आणि पहिल्या दहा बंदरापैकी एक असेल. वाढवणमुळे भविष्यात महाराष्ट्रासोबतच भारत मेरीटाईम शक्तीच्या रूपात उदयास येईल. जागतिक व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताचे स्थान अधोरेखित असेच राहील. या बंदराच्या उभारणीमुळे मेरीटाईम क्षेत्रात, त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनेक संधी निर्माण होतील.

मुख्यमंत्री.फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने नुकतीच महाराष्ट्र शिप बिल्डिंग पॉलिसी २०२५ जाहीर केली आहे. या धोरणांतर्गत जहाजबांधणीसाठी एक मजबूत इकोसिस्टम आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेरीटाईम व्हिजनमध्ये आणि अमृतकाल मेरीटाईम व्हिजनमध्ये, वाढवण पोर्ट एक मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये लॉजिस्टिक आणि ब्लॉकचेन या दोन क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची सामरिक शक्ती आणि मेरीटाईम ताकद कशा प्रकारे विस्तारित करू शकू, यावरही राज्य शासन कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सागरी शांततेतून विकास

केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले की, शांतताप्रिय देशांमध्ये गुंतवणूक वाढते. देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली स्थैर्य निर्माण झाले आहे, त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे वातावरण तयार झाले आहे. सागरी क्षेत्र विकसित भारत निर्मितीतील महत्त्वाचा घटक ठरत आहे.

गुंतवणुकीचे नवे क्षितिज

या परिषदेत १०० पेक्षा अधिक देशांतील साडेतीनशेहून अधिक तज्ज्ञ सहभागी झाले असून, सागरी क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारत आणि विविध देशांमधील परस्पर सहकार्य वाढवून जागतिक सागरी उद्योगांना नवे बळ देण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *