‘द ताज स्टोरी’ च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
मुंबई, दि. २९ : ‘ द ताज स्टोरी ‘ हा सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच आता कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.दिल्ली उच्च न्यायालयानं ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे. या चित्रपटावर ऐतिहासिक तथ्ये विकृत करण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करत एका जनहित याचिकेद्वारे (PIL) बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावत चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी दिली आहे. सिनेमात परेश रावल, जाकिर हुसैन, अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमित दास यांसारख्या लोकप्रिय कलाकरांच्या भूमिका आहेत. ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अधिवक्ता शकील अब्बास आणि भाजप नेते रजनीश सिंह यांनी या चित्रपटा विरोधात याचिका दाखल केली होती. चित्रपटात ताजमहलशी संबंधित ऐतिहासिक घटना चुकीच्या पद्धतीनं दाखवल्या जात असून, यामुळं जातीय सलोखा बिघडू शकतो, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या याचिकेत केंद्र सरकार,सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन(CBFC) आणि चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते परेश रावल यांना पक्षकार बनवण्यात आलं होतं.चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच इतिहास विकृत करून जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असं कारण देत याचिकाकर्त्यांनी या प्रकरणाची तातडीनं सुनावणी करण्याची मागणी केली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावत, प्रकरण सामान्य प्रक्रियेनुसारच ऐकलं जाईल, असंही स्पष्ट केलं.
चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार अमरीश गोयल यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले, द ताज स्टोरी’ ही कल्पना किंवा अफवांवर आधारित फिल्म नाही. आमच्या टीमनं सहा महिने सखोल संशोधन, ऐतिहासिक सल्ला आणि प्रमाणित पुराव्यांच्या आधारावर निर्मिती केली आहे.
CBFC नं देखील प्रत्येक पैलूची बारकाईनं तपासणी केल्यानंतरच याला मंजुरी दिली आहे. आमचा उद्देश कधीही कोणत्याही समुदायाला भडकवणं नव्हता, तर एक रिसर्च-आधारित दृष्टिकोन सादर करणं होता, ज्यामुळं लोक विचार करतील आणि चर्चा करतील. निर्माते सीए सुरेश झा यांनीही याचिका निराधार असल्याचं म्हटलं आहे.