पुण्यातील शास्त्रज्ञानी लावला विश्वातील सर्वात दूरच्या दीर्घिकेचा शोध
पुणे, दि. 5 : टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (NCRA) संशोधक राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांनी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) च्या डेटाचे विश्लेषण करताना विश्वातील सर्वात दूरच्या आणि प्रारंभिक काळात अस्तित्वात असलेल्या अलकनंदा नावाच्या सर्पिल दीर्घिकेचा शोध लावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही दीर्घिका विश्व केवळ 1.5 अब्ज वर्षांचे असताना पूर्ण विकसित अवस्थेत होती.
संशोधनाचा प्रवास साधारण दोन वर्षांपूर्वी सुरू झाला. JWST च्या UNCOVER सर्व्हे मधील रेडशिफ्ट 4 पेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या अंदाजे 2700 वस्तूंच्या अभ्यासादरम्यान राशी जैन या विद्यार्थिनीने ही आगळीवेगळी रचना असलेली दीर्घिका अपघाताने ओळखली. फेब्रुवारी 2024 मध्ये प्रथमच ही दीर्घिका त्यांच्या निदर्शनास आली. पुढील दीड वर्ष सूक्ष्म तपासणी, विश्लेषण आणि मॉडेलिंग करून यावर सखोल संशोधन करण्यात आले. अखेर हा शोधलेख आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित जर्नल Astronomy & Astrophysics मध्ये प्रकाशित झाला.
जैन आणि वाडदेकर यांनी दीर्घिकेला अलकनंदा हे नाव विशेष विचार करून दिले. मंदाकिनी नदी ही गंगेची महत्त्वाची उपनदी आणि हिंदी भाषेत आकाशगंगेचे नाव देखील मंदाकिनी असल्याने, तिच्या भगिनी नदीचे नाव या नवीन दीर्घिकेला देणे योग्य ठरेल असे संशोधकांना वाटले.
SL/ML/SL