सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या EVM विरोधातील सर्व याचिका

नवी दिल्ली, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या वापराबाबत विरोधी पक्षांनी निर्माण केलेल्या प्रश्नचिन्हांवर आज सर्वोच्च न्यायालयाने पडदा टाकला आहे. याबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे आता मतदार अगदी नि:शंकपणे EVM द्वारे आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.
या सर्व याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने मतदान ईव्हीएमवरच होईल, असं स्पष्ट केलं. खंडपीठाने दोन निकाल दिले असून एकमत मात्र याचिका फेटाळण्याच्या बाजूनेच असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, सर्व व्हीव्हीपॅट यंत्रांची मतदानानंतर चाचपणी करण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायमूर्ती खन्ना व न्यायमूर्ती दत्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी झाली. “आम्ही या प्रकरणात दोन निर्देश दिले आहेत. उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्रे सीलबंद करण्यात यावीत. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंतच्या किमान ४५ दिवसांचा मधला कालावधी असायला हवा”, असं न्यायमूर्ती खन्ना यांनी निकालात म्हटलं आहे.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण चाचपणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल. यानंतर तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकामार्फत ही तपासणी केली जाईल. यासाठी येणारा खर्च संबंधित उमेदवाराला उचलावा लागेल. जर ईव्हीएम मशीनशी छेडछाड केल्याचं निष्पन्न झालं, तर हा खर्च उमेदवाराला परत दिला जाईल”, असं न्यायमूर्ती खन्ना यांनी दिलेल्या निर्देशांमध्ये नमूद केलं.
SL/ ML/SL
26 April 2024