कल्याण-भांडूप परिमंडलांतील 1 लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वा कोटींची बचत
मुंबई दि.1 (एम एमसी न्यूज नेटवर्क): महावितरणच्या कल्याण व भांडूप परिमंडलातील पर्यावरणस्नेही 1 लाखांहून अधिक वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास पसंती दिली आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक जवळपास सव्वा कोटी रुपयांचा थेट फायदा होत आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमानुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत कल्याण परिमंडलातील 52 हजार 129 तर भांडूप परिमंडलातील 49 हजार 856 पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. दोन्ही परिमंडलातील एकूण 1 लाख 1 हजार 985 वीजग्राहक या उपक्रमात सहभाग घेऊन वर्षाला 120 रुपयांप्रमाणे 1 कोटी 22 लाख 38 हजार 200 रुपये वाचवत आहेत.
आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो-ग्रीन’ उपक्रम पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारेही वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइन पद्धतीने लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी होऊन आर्थिक बचत करण्याबरोबरच निसर्ग संवर्धनास हातभार लावण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. गरजेनुसार वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. वीजग्राहकांना ‘गो-ग्रीन’ उपक्रमाचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळ येथे सुविधा उपलब्ध आहे.
नवीन वर्षाची भेट, एकरकमी मिळवा सूट
दरम्यान, नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीजबिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीजबिलात 10 रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रुपये एकरकमी सवलत मिळणार आहे. महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वाशी मंडल आघाडीवर
दोन्ही परिमंडलात गो ग्रीनच्या नोंदणीत वाशी मंडलाने आघाडी घेतली आहे. वाशी मंडलातील 22 हजार 436, ठाणे शहर मंडलातील 18 हजार 798, कल्याण-1 मंडलातील 18 हजार 572, वसई मंडलातील 14 हजार 619, कल्याण-2 मंडलातील 13 हजार 652, पेण मंडलातील 8 हजार 622 व पालघर मंडलातील 5 हजार 286 वीजग्राहकांनी गो-ग्रीनमध्ये नोंदणी करून छापील बिलांना अलविदा केला आहे.
SW/ML/SL
1 Feb. 2025