स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
आत्मार्पण दिनानिमित्त त्यांच्या जन्मगावी अभिवादन

नाशिक दि २६– जिल्ह्यातील भगूर या जन्मगावी सावरकर स्मारक येथे पुरातत्व विभाग विविध संस्था संघटना कारगिल युद्ध माजी सैनिकांची संघटना आदर्श सैनिक फाउंडेशनचे अपंग सैनिक, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली.
भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून जीवनभर ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या सावरकरांची मातृभूमी प्रति तुझ साठी मरण ते जनन हीच निष्ठा होती. अष्टपैलू सावरकर उत्तम लेखक आणि कवी होते मराठी भाषा शुद्धीसाठी प्रयत्न करणारे आणि समाजातील जातिभेद अस्पृश्यता निवारणासाठी कार्य करणारे नेते होते. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथील सावरकर स्मारकामध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने सोमनाथ बोराडे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तर नाशिक मधील भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने मानवंदना दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वचनांचे फलक हाती घेऊन आणि सावरकरांचा आणि भारत मातेचा जयघोष करीत भारतीय जनता चे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक सावरकर प्रेमी नाशिक मधील पाथर्डी फाटा येथील शिवस्मारक ते भगूर येथील सावरकर स्मारक येथे पदयात्रेने येऊन दाखल झाले होते. सावरकरांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी चारुदत्त दीक्षित आणि सहकाऱ्यांनी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. दिवसभर स्मारकामध्ये सावरकर प्रेमींची गर्दी ओसंडून वाहत होती .