‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र
मुंबई, दि. 3 : दादर येथील ‘सावरकर सदन’या वास्तूला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार नाही, असे भारतीय पुरातत्त्व संरक्षण विभागाने उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील ही वास्तू १९३८ मध्ये बांधली गेली असून तिचे वयोमान १०० वर्षांपेक्षा कमी असल्याने ती केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करता येणार नाही, असे विभागाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकारच्या यादीत समाविष्ट झाल्यास तिचे जतन शक्य होईल.
‘सावरकर सदन’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे १९६६ पर्यंतचे निवासस्थान होते. येथे अनेक ऐतिहासिक बैठका झाल्या होत्या. जनहित याचिकेत या इमारतीला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.दरम्यान, ‘अभिनव भारत कॉंग्रेस’ने ‘सावरकर सदन’ला वारसा स्थळाचा दर्जा देण्याची आणि ‘जिना हाऊस’चे नाव बदलून ‘रतनबाई हाऊस’ करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर उत्तर देताना पुरातत्त्व विभागाने आपली भूमिका न्यायालयात मांडली.
SL/ML/SL