सावरकर , राहुल गांधी आणि खोके यांनी पुन्हा विधानसभा ठप्प
मुंबई दि २४– विधिमंडळ आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारणाऱ्याना निलंबित करा अशी मागणी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. याला भाजपाच्या आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं, मुख्यमंत्र्यांना उद्देशून खोक्यांच्या घोषणा देणाऱ्यांना ही निलंबित करा अशी मागणी केली. यावर सुरू झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचा एक तास वाया गेला.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पायाऱ्यांवरचे संपूर्ण व्हिडिओ फुटेज तपासून पाहू त्यानंतर निर्णय घेऊ , असे प्रकार कोणीही करू नये अशा सक्त सूचना सगळ्यांनाच दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचे यात समाधान झाले नाही, त्यांनी जागा सोडल्या , पुढे येत त्यांनी घोषणाबाजी केली, त्यातच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याबाबत काही वक्तव्य झाले , त्यावर सत्तारूढ सदस्य संतप्त होत पुढे आले, गदारोळ मोठा झाला. यात तीन वेळा कामकाज तहकूब झाले.सभागृह तहकूब झाल्यावरही दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरूच होती.
आम्हाला वारंवार गद्दार , खोके बोलता त्यांचं काय , पंतप्रधानांचा अपमान अजिबात योग्य नाही तो ऐकून घेणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.दोन्ही बाजूने कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला हेही चुकीचं , हा देशाचा अपमान आहे, सावरकरांचा अपमान करणं हाही देशाचाच अपमान आहे, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल घोषणा देणं कोणत्या आचार संहितेत बसतं ते सांगा असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.देशाचा सन्मान जगभरात वाढवला त्यांचा अपमान आम्हीच काय कोणीही सहन करणार नाही, यापुढे बोलताना सगळ्यांनी तारतम्य बाळगावे. यावर बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्षांनी कबूल केलं तशी कारवाई करावी अशी मागणी केली.
विधान भवन आवारात काल घडलेली घटना अयोग्य आणि चुकीची , आज सभागृहातील काहींची भाषा ही चुकीची , आपली मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री ,विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते यांच्यासोबत बैठक झाली , त्याबाबतचा निर्णय उद्या घेतला जाईल अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली.
अशा घटना वारंवार घडत आहेत त्या रोखण्यासाठी एक आचारसंहिता लागू केली जाईल, उल्लंघन झाल्यास त्यावर कारवाई केली जाईल अशीही भूमिका अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केली आणि कामकाज सुरळीत सुरु झाले.
ML/KA/SL
24 March 2023