सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी क्रांतीगीता महाबळ आणि कार्याध्यक्षपदी स्वप्नील सावरकर
मुंबई दि ४ – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर आधारीत कार्य करण्यासाठी स्थापन झालेली पहिली संस्था हा मान असणाऱ्या सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतीगीता महाबळ यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे तसेच, कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर, प्रमुख कार्यवाह म्हणून विनायक काळे, सहकार्यवाहपदी सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने आणि कोषाध्यक्षपदी अरुण नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१९६७ साली स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनासह सावरकर साहित्य प्रचार यात्रा, वक्तृत्त्व-निबंध-काव्य स्पर्धा, संस्कार शिबिरे, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन, प्रश्नावली स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात झालेल्या वार्षिक सभेत नव्या कार्यकारिणीची आणि पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली.
मावळते अध्यक्ष ज्येष्ठ सीए चंद्रशेखर वझे यांनी नव्या कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या असून भविष्यातही संस्थेला सल्लागार म्हणून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. मंडळाचे दिवंगत अध्यक्ष शंकरराव गोखले यांच्या निधनानंतर ही पहिली वार्षिक सभा झाली.ML/ML/MS