स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त

 स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात आज विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून नम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच प्रसार माध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी करत आहोत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची तसेच आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पहिल्यांदाच आग्रा येथे नुकतीच साजरी करण्यात आली.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र शासनातील मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, कपिल पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, प्रख्यात शिल्पकार श्रीराम सुतार देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जे योगदान आहे, त्याग आहे, ते सर्वांना सांगायची आवश्यकता नाही. खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त होते. ते साहित्यिक होते, समाजसुधारक होते आणि त्यांचे तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आले आहे.

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून आपले प्रखर देशाभिमानी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी अतिशय ऐतिहासिक अशा वास्तूची संकल्पना मांडली आहे. आज या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण होत आहे, हे देशासाठी अभिमानाची बाब आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल, वृद्धिंगत होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

आजचा दिवस हा 140 कोटी लोकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले. तसेच मोदींनी विक्रमी वेळेत संसदेचे बांधकाम पूर्ण केले, असे ही शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र शासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशी घोषणा शासनातर्फे करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

ML/KA/SL

28 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *