१० ते १४ डिसेंबर होणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
पुणे, दि. २४ : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षी बुधवार दि. १० डिसेंबर ते रविवार दि. १४ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे संपन्न होणार असून महोत्सवात यावर्षी सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली. यंदा महोत्सवाचे ७१ वे वर्ष असून यावर्षी निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच आपली कला या व्यासपीठावर सादर करतील, अशी माहितीही श्रीनिवास जोशी यांनी दिली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विश्वस्त शिल्पा जोशी या देखील उपस्थित होत्या. महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरु केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. रसिक, जाणकार श्रोत्यांनी देखील महोत्सवावर अपार प्रेम केले. यंदाच्यावर्षीही नवोदित तरीही आश्वासक, दमदार कलाकारांना या महोत्सवासारखे व्यासपीठ मिळावे, या हेतूने दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे. विशेष म्हणजे एकूण कलाकारांच्या संख्येच्या निम्म्याहून अधिक कलाकार हे पहिल्यांदाच महोत्सवात आपली कला सादर करतील. या प्रयत्नाद्वारे युवा कलाकारांना एक सक्षम व्यासपीठ देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.”
७१ व्या महोत्सवात आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांची यादी खालीलप्रमाणे –
दिवस पहिला – बुधवार दि. १० डिसेंबर, २०२५ | दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत
यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या शहनाईवादनाने होईल. लोकेश यांनी आपले वडील कालीचरण, पं. अनंतलाल आणि पं. दयाशंकर यांकडे शहनाईवादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. किराणा घराण्याच्या गायिका असलेल्या डॉ चेतना पाठक यानंतर आपली गायनसेवा सादर करतील. डॉ. पाठक या स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत. यानंतर बनारस घराण्याचे गायक आणि पं. राजन मिश्रा यांचे सुपुत्र- शिष्य असलेल्या रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन संपन्न होईल. भारतरत्न पं. रविशंकर यांचे शिष्य असलेले पं शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी विदुषी सास्किया राव- दे-हास हे यानंतर सतार व चेलो असे सहवादन प्रस्तुत करतील. मूळच्या नेदरलँड्सच्या असलेल्या सास्किया यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संगीताची दीर्घकालीन साधना केली असून ‘भारतीय चेलो’ या अद्वितीय वाद्याची निर्मिती करून त्यांनी पूर्व व पश्चिम संगीत परंपरांमध्ये नवे पूल बांधले आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.
दिवस दुसरा – गुरुवार दि. ११ डिसेंबर, २०२५ | सायं ४ ते रात्री १० वाजेपर्यंत
दुसऱ्या दिवसाची सुरुवात शास्त्रीय गायक, संगीतकार असलेल्या हृषिकेश बडवे यांच्या गायनाने होईल. यानंतर सेनिया मैहर घराण्याचे प्रतिभावान सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांचे सरोदवादन रंगेल. इंद्रायुध हे पद्मश्री पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे सुपुत्र व शिष्य आहेत. यानंतर किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आणि सवाई गंधर्व यांच्या नातसून असलेल्या विदुषी पद्मा देशपांडे यांचे गायन सादर होईल. यानंतर जॅझ व भारतीय शास्त्रीय संगीत यांचा अभूतपूर्व संगम साधणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सॅक्सोफोनवादक जॉर्ज ब्रूक्स आणि पं रविशंकर यांचे शिष्य असलेल्या पं. कृष्णमोहन भट (सतार) यांचे सहवादन सादर होऊन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.
दिवस तिसरा – शुक्रवार दि. १२ डिसेंबर, २०२५ | सायं. ४ ते रात्री १० वाजेपर्यंत
तिसऱ्या दिवसाची सुरुवात उदयोन्मुख संतूरवादक सत्येंद्र सोलंकी यांच्या वादनाने होईल. सोलंकी हे पं. ओमप्रकाश चौरसिया यांचे शिष्य आहेत. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन संपन्न होईल. इमदादखानी घराण्याचे कलाकार असलेले उस्ताद शुजात हुसेन खान यानंतर सतारवादन सादर करतील. जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने तिसऱ्या दिवसाचा समारोप होईल.
दिवस चौथा शनिवार दि. १३ डिसेंबर, २०२५ | दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत
चौथ्या दिवसाची सुरुवात बंगळुरूमधील तरुण, प्रतिभावान गायक सिद्धार्थ बेलमण्णु यांच्या गायनाने होईल. बेलमण्णु हे किराणा व ग्वाल्हेर परंपरेच्या पं. विनायक तोरवी यांचे शिष्य आहेत. यानंतर पुण्याच्या भेंडीबाजार घराण्याच्या अग्रगण्य गायिका अनुराधा कुबेर यांचे सादरीकरण होईल. मैहर घराण्याचे आघाडीचे बासरीवादक आणि पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे पहिले गंडाबंध शिष्य पं. रूपक कुलकर्णी हे यानंतर बासरीवादन प्रस्तुत करतील. यानंतर डॉ. भरत बलवल्ली यांचे गायन संपन्न होईल. यानंतर विदुषी कला रामनाथ (व्हायोलिन) आणि विदुषी डॉ. जयंती कुमरेश (विचित्रवीणा) या सहवादन सादर करतील. विदुषी कला रामनाथ या ‘सिंगिंग व्हायोलिन’च्या निर्मात्या म्हणून जगभरात सन्मानित असलेल्या भारतीय व्हायोलिनवादक आहेत. तर विदुषी डॉ. जयंती कुमरेश या भारतीय राष्ट्रीय वाद्य असलेल्या सरस्वती वीणेच्या आघाडीच्या वादक, संशोधक, संगीतकार व शिक्षिका आहेत. महोत्सवाच्या चौथ्या दिवसाचा समारोप आसाममधील प्रसिद्ध कथक नृत्यांगना मेघरंजनी मेधी यांच्या नृत्यप्रस्तुतीने होईल. नामवंत कथक गुरु मारामी मेधी आणि ख्यातनाम गायक जॉयप्रकाश मेधी यांच्या त्या कन्या व शिष्या असून पुढे पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे मार्गदर्शन देखील त्यांना लाभले आहे.
दिवस ५ वा – रविवार दि. १४ डिसेंबर, २०२५ | दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत
महोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या दिवसाची सुरुवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं उपेंद्र भट यांच्या गायनाने होईल. यानंतर किराणा आणि ग्वाल्हेर परंपरेतील गायिका श्रुति विश्वकर्मा मराठे आपली गायनसेवा सादर करतील. श्रुती या डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे आणि पं. केदार बोडस यांच्या शिष्या आहेत. यानंतर आश्वासक युवा गायक अनिरुद्ध ऐताळ यांचे गायन होईल. यानंतर सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे आपली गायनकला सादर करतील. सावनी या ग्वाल्हेर घराण्याच्या प्रख्यात गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या शिष्या आहेत. यानंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिनवादक, गायक, संगीतकार आणि ईस्ट-वेस्ट संगीतप्रवाहाचे अग्रगण्य प्रवर्तक म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या डॉ. एल. शंकर यांचे व्हायोलिन वादन संपन्न होईल. अमेरिकास्थित डॉ. शंकर यांनी जॉन मॅक्लॉफलिन, झाकिर हुसेन आणि टी. एच. विनायकम् यांच्यासह जागतिक ख्यातीच्या ‘शक्ती’ समूहात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यानंतर ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन संपन्न होईल. तर ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या कलाकारांची प्रस्तुती असलेल्या ‘अर्घ्य’ या कार्यक्रमाने होईल. यामध्ये पं. उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी, आनंद भाटे आणि विराज जोशी हे किराणा घराण्याचे कलाकार गायनसेवा सादर करतील.
महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणारे कलाकार खालीलप्रमाणे –
लोकेश आनंद. डॉ. चेतना पाठक, शुभेंद्र राव, सास्कीया राव – दे-हास, ऋषिकेश बडवे, इंद्रायुध मजुमदार, जॉर्ज ब्रूक्स, पं. कृष्णमोहन भट, सत्येंद्र सोलंकी, सिद्धार्थ बेलमण्णू, अनुराधा कुबेर, पं. रूपक कुलकर्णी, डॉ. भरत बलवल्ली, मेघरंजनी मेधी, श्रुती मराठे, अनिरुद्ध ऐताळ, डॉ. एल शंकर.
कल्याणी समूह हे या महोत्सवाचे प्रस्तुतकर्ते असून किर्लोस्कर समूह, मगरपट्टा सिटी ग्रुप, पु. ना. गाडगीळ अँड सन्स, केले ग्रुप, रांजेकर रिअल्टी, लोकमान्य मल्टीपर्पज – को ऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना आणि आशा पब्लिसिटी आदी प्रायोजकांचे सहकार्य यंदाच्या ७१ व्या महोत्सवास लाभले आहे.ML/ML/MS