सत्यपाल मलिकांचे भाजपवर गंभीर आरोप

 सत्यपाल मलिकांचे भाजपवर गंभीर आरोप

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “२०२४ मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक राममंदिरावर हल्ला घडवून आणू शकतात किंवा भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याची हत्या घडवून आणू शकतात. जे लोक पुलवामा हल्ला घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात. या लोकांना कशाचीही परवा नाही. ते चुकीच्या मार्गाने चालले आहे.” असे म्हणत भाजपवर गंभीर आरोप करणारा जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज सकाळपासून सत्यपाल मलिक ट्विटरवरही ट्रेडिंग आहेत. त्यांच्या ४० सेकंदाच्या व्हिडीओतून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.

सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “मला भिती याची आहे की कोणी काही खोडसाळपणा करेल. जसं की राम मंदिरावर हल्ला करतील, भाजपाच्या मोठ्या नेत्याला मारतील. ते अशी कामं करू शकतात. जे पुलवामा घडवू शकतात ते काहीही करू शकतात. त्यांना संसदेची अजिबात पर्वा नाहीय. ते चुकीच्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी आताच निघून जावं. हरल्यानंतर जाणं चांगलं दिसेल का? मी खात्री देतो की, २०२४ मध्ये हे जिंकणार नाही”, असं सत्यपाल मलिक व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

ट्विटरवर ट्रेंड होणारा हा व्हिडीओ ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी शेअर केला आहे. काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी किती भयंकर गोष्ट सांगितली आहे, असं प्रशांत भूषण म्हणाले आहेत.

“मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान पद टिकवण्यासाठी काय करू शकतात याबाबत मोदींचे एकेकाळी निकटवर्तीय राहिलेल्या आणि जम्मू-काश्मीर व गोव्याचे गव्हर्नर पद भूषविलेल्या सत्यपाल मालिकांचे खळबळजनक दावे!”, असं ट्वीट महाराष्ट्र काँग्रेस या अधिकृत ट्विटर पेजवरून करण्यात आलं आहे.

याआधी देखील मलिक यांनी भाजपला कोंडीत पकडणारे दावे केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काश्‍मीरकडे दुर्लक्ष होते आणि येथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यानेच नंतर पूलवामा हल्ला झाला, असा सनसनाटी आरोप याआधी सत्यपाल मलिक यांनी केला होता. मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारसा तिटकाराही नाही, असेही मलिक यांनी म्हटले होते.

जवानांना हवाई मार्गाने नेण्याची ‘सीआरपीएफ’ने केलेली मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळली होती, जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणी झाली नव्हती, असा दावा मलिक यांनी केला होता.

SL/KA/SL

31 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *