देशात लवकरच सुरु होणार सॅटेलाईट आधारित टोल सिस्टिम
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील महामार्ग उभारणीत बहुमोल योगदान देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वाहतूक सुविधा सुलभतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारणीसाठी ही प्रयत्नशील असतात. आता महामार्गावरील टोल वसुलीसाठी अजून एका अत्याधुनिक यंत्रणेची उभारणी होणार असल्याची माहिती नुकतीच गडकरी यांनी दिली. महामार्गांवरून होणारी टोल वसुली हा विषय नेहमीच चर्चिला जातो. टोल नाक्यावर वाहतूक खोळंबा टाळण्यासाठी फॅस्टॅगचा अधिकाधिक अवलंब व्हावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. टोलनाक्यावर टोल वसुलीसाठी लांबच लांब रांगा लागतात. फास्टॅगचा वापर होत असला तरी कोड स्कॅनिंगसाठी वेळ लागतोच. तसेच टोल नाके, कर्मचारी यांचा खर्चही मोठा आहे. मात्र आता ही यासर्व प्रक्रिया बंद होणार आहे. देशात लवकरच सॅटेलाईट टोल सिस्टिम सुरु होणार आहे. त्याआधारे तुम्ही वाहनातून प्रवास करत असतानाच ठराविक अंतरानंतर तुमचा टोल कापण्यात येईल. सॅटेलाईट यंत्रणेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण होईल.
नागपूरमध्ये वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपग्रहआधारीत टोल वसुली यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामाध्यमातून थेट तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील. वाहनधारक जितका प्रवास करेल त्या अंतरात ठराविक ठिकाणी हा टोल कापण्यात येईल. जितका प्रवास तितकी रक्कम मोजावी लागणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे.
सॅटेलाईन टोल वसुली कशी करावी, त्यातील अडचणी काय, तसेच ही प्रक्रिया सुलभ आणि सुकर कशी करता येईल, यासाठी देशातील तीन ठिकाणी याविषयीचा प्रयोग सुरु आहे. बंगळुरु, म्हैसूर आणि पानिपत येथे पथदर्शी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. 2024 मध्येच देशभरात ही पद्धत लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याविषयीची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
SL/ML/SL
30 March 2024