सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाला १०५ गावांचा पाठिंबा
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाने गती घेतली आहे. या प्रकल्पाबाबत तापोळा येथे झालेल्या बैठकीत 105 गावांतील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार असल्याने स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत होणार असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या प्रकल्पात समाविष्ट केलेली गावे ही अतिदुर्गम भाग म्हणून ओळखली जाणारी आहेत. या अतिदुर्गम भागाशी प्रशासकीय यंत्रणेकडून कनेक्टिव्हिटी वेगळ्या पद्धतीने जोडली जात आहे. याच अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेने टप्प्याटप्प्याने त्या त्या गावातून सूचना मागून घेतलेल्या आहेत. या प्रकल्पात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील 214 गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व गाव कोयना जलाशयाबरोबर कन्हेर धरण, उरमोडी प्रकल्पच्या परिसरातील आहेत. या प्रकल्पात जावळी तालुक्यातील 46 गावांचा, पाटण तालुक्यातील 95 गावांचा, सातारा तालुक्यातील 34 गावांचा, महाबळेश्वर तालुक्यातील 60 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
PGB/ML/PGB
23 Aug 2024