सर्वद फाऊंडेशनचे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न

मुंबई, दि. ३० : साहित्याकडे केवळ ललित लेखन म्हणून पाहणे योग्य नाही कारण ते समाज मनाचा आरसा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना लिहायला लावले तर समाजाला नक्कीच दिशा मिळेल तसेच भविष्यातील पिढीला स्फूर्तीदायी ठरेल, असे विचार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महादेव गो. रानडे यांनी व्यक्त केले. सर्वद फाऊंडेशनचे प्रथम राज्यस्तरीय साहित्य संमेलन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सहकार्याने नुकतेच आयोजित करण्यात आले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने झाला. उद्घाटन सनदी अधिकारी हर्षवर्धन जाधव यांनी केले. त्यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी अनेक योजना असून त्याचा लाभ साहित्यिक संस्था तसेच साहित्यिकांनी घ्याव्यात, सर्वद फाऊंडेशनने नव्या पिढीतील साहित्यिक घडवावेत, असे विचार व्यक्त केले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बागवे यांनी साहित्यिक गंमतीजमती सांगत उपस्थितांना खळखळून हसवले. तर संमेलनाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रशंसा व्यक्त करत कवी सतिश सोळांकूरकर यांनी ‘शाळेतल्या दिवसांचा पाऊस’ ही कविता सादर केली. त्याला श्रोत्यांनी दाद दिली. कवी अरुण म्हात्रे यांनी कविता कशा स्फुरल्या जातात आणि त्यामागील भावभावनाचे विश्व यांचे सुंदर विवेचन केले.
प्रास्ताविकात बोलताना सर्वद फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. सुचिता पाटील यांनी मोबाईलच्या आभासी संवादात माणूस प्रत्यक्षात भेटून संवाद करण्यापासून दुर्मिळ झाला आहे. त्यामुळे सर्वद फाऊंडेशनने हे साहित्य संमेलन भरवून संवादाची भाषा समजून घेण्यासाठी सर्वांना एकत्र केले आहे, असे सांगतिले. मनाची ‘सर्व्हिसिंग’ करण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज असते. त्यामुळे कुठलेही आजार होत नाहीत तर समृद्धी वाढत जाते. मन ताजेतवाने ठेवण्यासाठी हे संमेलन नक्कीच उपयोगी ठरणारे आहे, असे विचार स्वागताध्यक्ष डॉ. किरण सावे यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. सुचिता पाटील यांच्या ‘झाले जलमय’ या कथासंग्रहांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सुहास राऊत यांनी केले.
दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले. त्याचे सूत्रसंचालन प्रा. विवेक कुडू, रुपाली राऊत आणि शीतल संखे यांनी केले. नंतर साहित्यिक डॉ. महेश अभ्यंकर, पत्रकार अशोक शिंदे, सुशील शेजुळे यांच्या मुलाखतींचा बहारदार कार्यक्रम रंगला. त्याचे सूत्रसंचालन निमा लोखंडे आणि नेहा राऊत यांनी केले. अभिजीत राऊत यांच्या सूत्रसंचालनाने सायंकाळचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. यात लावणी, मंगळागौर, तारपा आदी नृत्यांचे सादरीकरण कलाकारांनी केले.ML/ML/MS