मीरा-भाईंदरमध्ये जुन्या इमारत पुनर्विकासावर भव्य मार्गदर्शन शिबिर

मीरा-भाईंदर दि ५ : मीरा -भाईंदर शहरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जुना इमारत पुनर्विकास, ७९-ए प्रक्रिया, डीसी कंवर्जन, ७/१२ उतारा, सोसायटी नोंदणी यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर स्पष्टता आणण्यासाठी व त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या पुढाकारातून रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पद्मभूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, मेडतीया नगर, मिरारोड (पूर्व) येथे भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला शेकडो सोसायट्यांचे पदाधिकारी, नागरिक व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. नागरिकांनी आपल्या समस्या प्रत्यक्ष मांडल्या, तर उपस्थित तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी त्यावर तत्काळ मार्गदर्शन देऊन सोडवणुकीचे उपाय सुचवले.
शिबिराची ठळक वैशिष्ट्ये
नागरिकांच्या प्रश्नांना थेट उत्तरे.
पुनर्विकासाशी संबंधित कागदपत्रांवर सविस्तर माहिती.
शंका निरसनासाठी अधिकाऱ्यांचे थेट मार्गदर्शन.
भविष्यात नियमित शिबिरांचे आश्वासन
या शिबिरामुळे मीरा-भाईंदर शहरातील जुनी इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला. त्याचसोबत आजप्रमाणेच पुढे देखिल सातत्याने अशाप्रकारचे मार्गदर्शन शिबिर मीरा-भाईंदरच्या जनतेच्या हक्कासाठी घेतले जातील, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की,
“नागरिकांना पुनर्विकास प्रक्रियेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीचे निराकरण करणे हे माझे कर्तव्य आहे. शासन व प्रशासनाचे दरवाजे नागरिकांसाठी सदैव खुले आहेत. या शिबिरातून मिळालेल्या सूचनांच्या आधारे पुढील काळात आम्ही अधिक ठोस निर्णय घेऊ आणि प्रत्येक नागरिकाच्या घरकुलाचा प्रश्न सोडवू. कागदपत्रांचा योग्य तो पाठपुरावा करून लवकरात लवकर दिलासा दिला जाईल, योग्य तो न्याय केला जाईल.”
या शिबिरात नागरिकांना मार्गदर्शन देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मीरा -भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, ठाणे जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे, मीरा -भाईंदर अप्पर तहसीलदार निलेश गौंड, उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे तालुका – मीरा -भाईंदर किशन रतनाळे, सहाय्यक संचालक, नगर रचनाकार मीरा-भाईंदर महानगरपालिका पुरुषोत्तम शिंदे आणि त्याचसोबत संबधित विषयाचे शासकीय कर्मचारी देखिल उपस्थित होते.ML/ML/MS