अतिवृष्टीमुळे संत्रा बागांचे प्रचंड नुकसान, वाढीव मदतीची मागणी

वाशीम दि १३ : वाशीम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी ती तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः मालेगाव व रिसोड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे संत्र्याच्या झाडांवरील फळांची गळती होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मृग व आंबिया दोन्ही बहराचं नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळे अनेक झाडं वाळू लागली असून, मागील पाच-सहा वर्षांपासून आपल्या मुलाप्रमाणे जपलेल्या संत्रा बागा आता उध्वस्त होत आहेत. परिणामी हेक्टरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे अद्यापही सर्वेक्षण झालेले नसल्याने ते मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आर्थिक नुकसानीमुळे उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले असून रब्बी हंगामाचे नियोजन व संसाराचा गाडा कसा चालवायचा, या चिंतेत शेतकरी सापडले आहेत. नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट विशेष वाढीव मदत व विमा संरक्षण देण्याची मागणी सर्वत्र होत आहे.ML/ML/MS