संतोष देशमुख हत्या, चर्चेसाठी पवारांचा फडणवीसांना फोन
मुंबई दि. ८ (ताजेश काळे) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. पवनचक्की मालकांना खंडणीसाठी त्रास दिला जात असून या गंभीर प्रकारावर तातडीने आळा घालण्याची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
बीडसह सातारा, पाटण, कोल्हापूर, सांगली या भागांमध्येही खंडणीची प्रकरणे वाढली आहेत, याकडे पवारांनी फडणवीस यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी ही बाब गंभीरतेने घेऊन खंडणीखोरांची दहशत मोडून काढण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन शरद पवार यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. या पत्रात हे खून प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका असल्याने राज्यसरकारने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन संबंधित नेत्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
देशमुख यांच्या हत्येला मोठा काळ उलटून गेला असला तरीही त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
ML/ML/SL
8 Jan. 2025