धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील अधिकारी, अभियंत्यांचा सन्मान.
मुंबई, 21
बृहन्मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पात महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे. या अधिकारी आणि अभियंत्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते आज (दिनांक २१ जानेवारी २०२५) प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) (अतिरिक्त पदभार) श्री. मंतय्या स्वामी, सहायक आयुक्त श्री. शंकर भोसले आदींसह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते उपस्थित होते.
शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सदर रस्ता टप्याटप्याने दिनांक १२ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पासून सर्व मार्गिका पूर्णवेळ खुल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईसारख्या गतिमान शहरातील प्रवासाचा कालावधी कमी करणे, इंधनाची बचत साधणे तसेच वायूप्रदूषणात घट घडविणे असा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून शहरातील वाहतुकीची गती व एकूणच शहरी गतिशीलता आणखी सुधारण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले.
सदर प्रकल्प हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रतिष्ठित, महत्त्वाकांक्षी आणि बहुविध घटकांचा समावेश असलेला पायाभूत सुविधा उपक्रम आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी व अभियंते यांनी प्रकल्पाच्या नियोजन, अभिकल्पना, समन्वय आणि बांधकाम या सर्व टप्प्यांमध्ये प्रदर्शित केलेल्या तांत्रिक कौशल्य, अभिनव अभियांत्रिकी उपाययोजना आणि अखंड कार्यनिष्ठा यांचे फलित म्हणजे सदर प्रकल्प आहे.
वरील प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान प्रदर्शित केलेली कार्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि उत्कृष्ट समन्वय लक्षात घेता महानगरपालिका आयुक्तांनी सर्व अभियंत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी श्री. चंद्रकांत कदम, श्री. भूपेंद्र राठोड, श्री. ऋषिकेश पाटील, श्रीमती अर्चना रामगिरी, डॉ. विशाल ठोंबरे, श्री. संदीप चौरे, श्री. प्रशांत जगताप, श्री. विजय जोरे, श्री. प्रणव जगदाळे, श्री. अमित सिंग, निखिल मालुंजकर, श्री. नितेश चौधरी, श्री. आशीष फुलझेले, श्री. जयेश फंदाडे, श्रीमती प्रणाली भोसले आदी उपस्थित होते.KK/ML/MS