*विकास कामे होत नसल्याबाबत खासदारांची नाराजी

मुंबई, दि. ४ – मुलुंड ते मानखुर्द या उत्तर पुर्व लोकसभा क्षेत्रातील अनेक कामे प्रलंबित असून याबाबत पालिकेचे अधिकारी उदासिन असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वार्ड निहाय वारंवार तक्रारी करुनही लोकोपयोगी कामे होत नसल्याची तक्रार खा. संजय दिना पाटील यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली. याबाबतचे एक पत्र त्यांना दिले असून पालिका अधिका-यांची एक बैठक घेऊन प्रलंबित कामाबाबत आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

उत्तर पुर्व मतदार संघात मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भाग, झोपडपट्ट्या, दाट लोकवस्ती असल्याने या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होत असतात. डोंगराळ भागात अपूरा पाणीपुरवठा होत असून ही समस्या वर्षानुवर्षे असून त्याबाबत खा. संजय दिना पाटील यांनी पाठपुरवठा करुनही पालिका अधिकारी ही समस्या सोडवू शकले नाहीत. महिला उद्योग भवन, क्रीडा संकुल, अत्याधुनिक रुग्णालय या परिसरात नाहीत. वार्ड नुसार असलेले अगरवाल, सावित्रीबाई फुले रुग्णालय अद्यापही सुरु झालेले नाहीत. इतर रुग्णालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने रुग्ण सेवेवर त्याचा वाईट परिणाम होत आहे. हरिओम नगर परिसरात स्मशानभूमी नाही. त्यामुळे त्यांना अंत्यविधीसाठी टाटा कॉलनीत यावे लागते. अनेक रुग्णालयांच्या खाजगीकरणाला खा. संजय दिना पाटील यांनी विरोध केला आहे. पालिका शाळांचे “मुंबई पब्लिक स्कुल” करण्याबाबत तसेच या भागात अनेक प्रकल्प प्रलंबित असून त्यासाठी विकास निधी देण्यात यावा, अशा अनेक मागण्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्राव्दारे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केल्या आहेत. याबाबत आयुक्तांनी वरिष्ठ पालिका अधिका-यांची एक बैठक घ्यावी व या कामांबाबत चर्चा करावी. अशी मागणी खा. संजय दिना पाटील यांनी केली आहे. या बाबत त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन त्यांना पत्र दिले.ML/ML/MS