ब्रिटीश कालीन बिगर शेती कर रद्द, मुंबईतील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा

मुंबई, दि. १६ : – मुंबई शहर आणि उपनगरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना ब्रिटीश कालीन असलेला अकृषिक कर (NA TAX) रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरवठा करुन संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर महसुल मंत्र्यांनी या निर्णयास मान्यता दिली असून लवकरच त्यासंबंधी अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ब्रिटीश राजवटीत मुंबई शहर तसेच उपनगरात असलेल्या जमिनींवर शेती केली जात होती. वाढत्या लोकसंख्येनुसार शेतीच्या जमिनींवर बांधकाम व्यवसायिकांनी इमारती, सोसायट्या बांधण्यास सुरवात केली. त्यामुळे शेत जमिनीला बीगर शेती करण्यासाठी तत्कालीन शासनाने बांधकाम व्यवसायिकांकडून बाजारमुल्याच्या ३ टक्के अकृषित कर आकारण्यात येत होता. कालांतराने हा कर भरणा करण्याचा भुर्दंड सोसायट्यांवर लादला गेला. त्यामुळे वर्षानुवर्षे हा कर सोसायट्या भरत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील सहकारी गृहनिर्णाण संस्था, हौसिंग फेडरेशन तसेच सामाजिक संस्थांनी शासनाकडे विनंती केली होती की, सदर ब्रिटीश कालीन बिगर शेती कर पुर्णपणे रद्द करण्यात यावा. याबाबत शासनाकडून बैठका होऊनही अध्यादेश काढण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नव्हता. तर दुसरीकडे हा कर भरावा म्हणुन मुंबई शहर व उपनगरातील सोसायट्यांना नोटीसा देण्यात आल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे सोसायट्यांच्या तक्रारी आल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी हा कर रद्द करुन अध्यादेश काढण्याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेऊन हा कर पुर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे.ML/ML/MS