पालिकेच्या वाढीव दंडात्मक कारवाईला विरोध

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी कंत्राटदारांकडून किती दंड आकारला – खा. संजय दिना पाटील
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा १५ हजार रुपये प्रत्येक खड्ड्यांसाठी दंडात्मक म्हणुन भरावे लागणार आहेत. याचा विरोध खासदार संजय दिना पाटील यांनी केला असून हा दंड अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुर्वी खड्डे करणा-या गणेशोत्सव मंडळांना २ हजार रुपये दंड होता तो दंड साडेसात पट वाढविण्यात आला आहे. त्यामुळे मंडळांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणपतीसाठी तसेच विविध कार्यक्रमासाठी मंडप उभारणीसाठी खड्डे खणले जातात. गत वर्षी प्रत्येक खड्ड्यांमागे पालिकेने दोन हजार रुपये दंड आकारला होता. यंदा हा दंड १५ हजार रुपये करण्यात आला आहे. हा दंड अवाजवी असून तो रद्द करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने राज्य सरकार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. दरम्यान हा दंड अन्यायकारक असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा. अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे. मुंबईत सर्वच ठिकाणी हजारो खड्डे पडले आहेत. त्यासाठी कंत्राटदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर किती दंड आकारला आहे. असा जाबही खा. संजय दिना पाटील यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे. ML/ML/MS