विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरीता भांडुप मध्ये अभ्यासिका
मुंबई, दि. २५ – भांडुप परिसरात मुलांच्या अभ्यासाकरीता वाचनालय तसेच अभ्यासिका पाहिजे म्हणुन गेली अनेक वर्षे पालक आणि विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती. या मागणीला अनुसरुन ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदार निधीतून भांडुप पश्चिम येथे भव्य अशी वास्तु उभी करण्यात आली असून स्थानिक विद्यार्थ्यांना या वास्तुचा उपयोग अभ्यासाकरीता करता येणार आहे.

कामगार नेते, माजी आमदार दिवंगत दिना बामा पाटील यांच्या जयंती निमित्त वाचनालय व अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. शिवसेना विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या हस्ते या वास्तुचे उद्घाटन झाले.

भांडुप जंगल मंगल रोड येथे वाचनालय व अभ्यासिकेची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती. खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदार निधीतून जंगल मंगल रोड भांडुप पश्चिम येथे सर्व सुविधांनी सुसज्ज असे वाचनालय व अभ्यासिकेची वास्तु उभारण्यात आली. मुलांच्या अभ्यासाकरीता विविध प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. या वास्तुमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास करता येणार असून त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची पुस्तके येथे उपलब्ध राहतील, अशी माहिती स्व. दिना बामा पाटील प्रतिष्ठानच्या सचिव राजोल संजय पाटील यांनी दिली.ML/ML/MS