गोवंडीतील पब्लिक स्कूल लवकरच सुरू होणार

मुंबई, दि. ९ – गोवंडी येथील नटवर पारेख कंपाऊड मधील पब्लिक स्कूल अद्यापही सुरु न झाल्याने स्थानिक नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. एमएमआरडीएची इमारत पालिकेकडे हस्तांतरीत झाल्यानंतरही येथे वर्ग सुरु झालेले नाहीत. याबाबत खा. संजय दिना पाटील यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची भेट घेऊन शाळा सुरु करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर पालिकेच्या कार्यवाहीला वेग आला असून येथील रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
गोवंडी येथील नटवर पारेख कंपाऊंड मध्ये एमएमआरडीएने इमारत बांधून तीन वर्षे झाले आहे. ही इमारत नुकतीच पालिकेने आपल्या ताब्यात घेतली. मात्र या ठिकाणी त्यांना वर्ग सुरु करता आले नाही. शाळेच्या भोवती रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाच्या गाडयांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने वर्ग सुरु होण्यास विलंब होत होता. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खा. संजय दिना पाटील यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची भेट घेऊन शाळा सुरु करण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर पालिका व एमएमआरडीएचे अधिकारी तसेच युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी शाळेच्या इमारतीची व परिसराची पाहणी करुन अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून दिवाळी नंतर शाळा सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.ML/ML/MS