म्हैसाळ योजनेचे पाणी टंचाईग्रस्त जत पूर्व भागात दाखल …
सांगली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील जत पूर्व भागातील सोन्याळ, लकडेवाडी, उटगी, माडग्याळ, जाडरबोबलाद या सहा गावात विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी माडग्याळ ओढा पात्रात पोहोचले आहे. ऐन भीषण दुष्काळी परिस्थितींत आमदार विक्रम सावंत यांच्या विनंतीनुसार म्हैसाळ योजनेतील पाणी आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील गावांना पिण्याचे आणि शेतीला पाणी देण्यात येणार आहे. तसेच दोड्डीनाला प्रकल्पात १०.४४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. आठवडाभरात पाणीसाठा संपणार होता. पाणीसाठा कमी झाल्याने पूर्व भागातील ज्या गावांना २४ हजार क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा होता. ते मोठे टँकर बंद करून शेगाव तलावातून पाणीपुरवठा सुरु होता. अंतर जास्त असल्याने टँकर होत नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन आमदार विक्रम सावंत यांनी तातडीने म्हैसाळ योजनेतील अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली होती.
या बैठकीत म्हैसाळ अधिकाऱ्यांना तातडीने ज्या गावात भीषण पाणीटंचाई आहे. अशा गावात तातडीने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार माडग्याळ, सोन्याळ, लकडेवाडी, उटगी, जाडरबोबलांद या गावात पाणी माडग्याळ ओढ्यातून सोडले आहे. दोड्डीनाला तलावात लवकरच पोहोचणार आहे. पाणी आल्याने परिसरातील ६ गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करुन जल्लोष केला.
म्हैसाळ योजनेचे पाणी टंचाईग्रस्त जत पूर्व भागात दाखल …
ML/ML/PGB
21 May 2024